विश्वास नांगरे पाटील नागपूर' शहराचे नवे पोलीस आयुक्त

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2026-06-23 20:58:39
img

नागपूर : विश्वास नांगरे पाटील यांची बदली करण्यात आली असून नागपूरचे विद्यमान पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकपदी नियुक्त कऱण्यात आलं आहे.

नागपूर : राज्य शासनाने वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मोठा निर्णय घेत नागपूर शहराच्या पोलिस आयुक्तपदी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती केल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलिस महासंचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. विश्वास नांगरे पाटील हे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय आणि कार्यक्षम पोलीस अधिकाऱ्यांपैकी एक मानले जातात. १९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या नांगरे पाटील यांनी राज्यातील विविध महत्त्वाच्या पदांवर काम करत आपल्या धडाकेबाज कारभाराची छाप उमटवली आहे. त्यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, मुंबई पोलीस दलातील उपायुक्त, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, नाशिकचे पोलीस आयुक्त तसेच मुंबईतील कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. अलीकडे ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते.

२००८ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी ताज हॉटेलमध्ये दाखवलेल्या धाडसामुळे विश्वास नांगरे पाटील यांना देशभरात विशेष ओळख मिळाली होती. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे ते तरुणांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत. नागपूर शहरात अलीकडील काळात वाढत्या अंमली पदार्थांच्या तस्करी, सायबर गुन्हे, वाहतूक शिस्त आणि संघटित गुन्हेगारीविरोधातील मोहिमांना आणखी गती देण्याचे मोठे आव्हान नव्या पोलीस आयुक्तांसमोर असेल. नागपूर हे राज्याचे उपराजधानी शहर असल्याने व्हीआयपी सुरक्षा, मोठे राजकीय कार्यक्रम आणि संवेदनशील कायदा-सुव्यवस्था परिस्थिती हाताळण्याचा अनुभव असलेला अधिकारी म्हणून नांगरे पाटील यांच्याकडे विशेष अपेक्षेने पाहिले जात आहे. नांगरे पाटील यांच्या नियुक्तीचे शहरातील विविध सामाजिक, व्यावसायिक आणि युवक संघटनांकडून स्वागत करण्यात येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नागपूर पोलिस दल अधिक लोकाभिमुख, तंत्रज्ञानाधारित आणि गुन्हेगारीविरोधात अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Related Post