Mon Nov 17 17:46:58 IST 2025
मुंबई : फलटणच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या (Phaltan Doctor Suicide) प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडून करण्यात येणार आहे. या प्रकरणी एसआयटी (SIT) स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत. महिला डॉक्टर आत्महत्येचा तापस हा एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडून करण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वी फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली होती. या प्रकरणात तिने हातावर सुसाईड नोट लिहिल्याचं समोर आलं. तसेच आपल्यावर वरिष्ठांचा आणि पोलिसांचा दबाव असल्याची तिची तक्रारही समोर आली होती. या प्रकरणात भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे दोन पीए, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याच्यावर आरोप करण्यात आला. गोपाळ बदनेने आपल्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा आरोप महिला डॉक्टरने केला. तसेच पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी आपल्यावर वरिष्ठांचा आणि पोलिसांचा दबाव आल्याची तक्रारही तिने केली होती.
या प्रकरणात अनेक नावांचा समावेश असल्याने, त्याची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी सातत्याने लावून धरली. सातारा पोलिसांनी याची चौकशी केली तर त्यांच्यावर दबाव राहू शकतो, त्यामुळे एसआयटी चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत होती. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांवर आरोपांची राळ उठवली. या प्रकरणात त्यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच महिला डॉक्टरची आत्महत्या नसून ती हत्या असल्याचा दावा करत त्यांनी एसआयटी चौकशीच मागणी केली होती. त्यानंतर आता या प्रकरणाची एसआयटी चौकशी केली जाणार आहे. Phaltan Doctor Suicide SIT : महिला IPS अधिकाऱ्याची एसआयटी फलटण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत. या प्रकरणी राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही त्या भगिनीचा आदर करतो, मात्र या प्रकरणातील इतर दोन आरोपींशी झालेले तिचे चॅट समोर आले तर एक गंभीर ट्रँगल समोर येऊ शकतो. तो लोकांसमोर आणण्यासारखा नसल्याने पोलीस शांत असल्याचं जयकुमार गोरे म्हणाले.