Mon Nov 17 17:46:57 IST 2025
मुंबई : एकीकडे मतदारयाद्यांतील घोळावर मनसे (MNS) आणि विरोधी पक्षांकडून मोर्चा काढण्यात येत असून दुसरीकडे कायदेशीर लढा लढण्यासाठीही पावले उचलली जात असल्याचं दिसतंय. निवडणूक आयोगाच्या विरोधात ठाकरे बंधू कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या दोन दिवसात त्यासंबंधी याचिका दाखल करण्यात येणार असून मतदार यादीमधील दोष पुराव्यासह कोर्टात सादर करणार असल्याची माहिती आहे.
मतदार यादीतील घोळासंबंधी विरोधी पक्षाचे नेते कायदे तज्ज्ञांची भेट घेणार असून विविध पर्यायांची चाचपणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीतही त्यवर चर्चा झाली असून कोर्टात जाण्यासह निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या पर्यायावरही चर्चा झाल्याची माहिती आहे. मोर्चात सहभागी होणाऱ्या पक्षांनी मोर्चाची जोरदार वातावरणनिर्मिती केल्याचं दिसतंय. त्याचाच एक भाग म्हणून राज ठाकरेंनी गुरुवारी मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोग आणि केंद्र तसंच राज्य सरकारवर जोरदार तोफ डागली. हा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, असं सांगतानाच आपण स्वतः लोकलनं मोर्चासाठी जाणार असल्याचं ठाकरे म्हणाले. मतदारयाद्या स्वच्छ केल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, त्याला आणखी वर्ष लागलं तरी हरकत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, सत्याच्या मोर्चाला काँग्रेसकडून मोजक्याच नेत्यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महाविकास आघाडी, मनसे आणि इतर विरोधी पक्षाच्या सत्याच्या मोर्चाला काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या मोर्चाला उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं आहे. मतचोरी, मतदार यादीतील घोळ, दुबार मतदार आणि निवडणुकांमधील गैरव्यवहाराच्या विरोधात विरोधक एकवटले आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि मनसे येत्या शनिवारी एकत्रितपणे, मुंबईत 'सत्याचा मोर्चा' काढणार आहेत. त्याबाबत वाय बी चव्हाण सेंटर येथे बैठक पार पडली. महत्त्वाची बाब म्हणजे या बैठकीला राज आणि उद्धव ठाकरे उपस्थित होते.
नवी मुंबईतील मतदारयाद्यांमधील घोळ मनसेनं गेल्या काही दिवसांपासून चव्हाट्यावर आणल्याचं दिसून येतंय. पामबीच रोडवर 250 मतदारांची नोंदणी करण्यात आल्याचं समोर आलं. मात्र मनसेच्या रियालिटी चेकमध्ये त्यातला एकही मतदार त्या ठिकाणी आढळला नाही. जुईनगरमध्ये एका मतदाराच्या पत्त्यावर चक्क शौचालय असल्याचं आढळलं. तर नवी मुंबई मनपा आयुक्तांच्या निवास पत्त्यावर चक्क 150 जणांची नोंद झाली. गड किल्ल्यांवर उभारण्यात येणाऱ्या नमो टुरिझम सेंटरवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. शिवसेनेकडे असलेल्या पर्यटन विभागाने गड किल्ल्यांवर नमो टुरिझम सेंटर उभारण्याचा संकल्प सोडला, मात्र ते सेंटरच फोडण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.