भारतासोबतचे संबंध ताणले, अनेक पाकिस्तानी सैन्याचा राजीनामा

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2025-04-28 23:37:11.0
img

इस्लामाबाद: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेले आहेत. पाकिस्तानचे गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री भारताला थेट युद्धाच्या धमक्या देत आहेत. पण दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याच्या मनोबलावर सातत्यानं परिणाम होत आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख असीम मुनीर यांच्या कुटुंबियांनी देश सोडला आहे. वरिष्ठ पातळीवरील लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबांना युरोपियन देशांमध्ये पाठवलं आहे.

वरिष्ठ पातळीवर ही अवस्था असताना आता प्रत्यक्षात युद्धभूमीवर लढणाऱ्या अधिकारी आणि सैनिकांचं मनोधैर्य खचलं आहे. पाकिस्तानी सैन्यातील ५०० सैनिक आणि १०० अधिकाऱ्यांनी वैयक्तिक कारणांचा संदर्भ देत राजीनामे दिले आहेत. अवघ्या २ दिवसांत राजीनाम्यांचा पाऊस पडला आहे. त्यामुळे सैन्याची यु्द्ध लढण्याची मानसिकता नसल्याचं स्पष्ट झालं आहे. पाकिस्तानी सैन्यात बंडाळी होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. सैन्याच्या कमांडर्सकडून सातत्यानं बदलले जाणारे आदेश, मानसिक थकवा यामुळे सैनिक आणि अधिकारी वर्गानं राजीनामा देऊन कार्यमुक्त होण्याचा मार्ग निवडला आहे.

सामूहिक राजीनाम्यांमुळे भारताला लागून असलेल्या पाकिस्तानी सीमेच्या सुरक्षेचा प्रश्न शेजारी देशाला सतावू लागला आहे. भारत-पाक सीमेच्या सुरक्षेची जबाबदारी ११ व्या कोअरकडे आहे. याचं नेतृत्व सध्याच्या घडीला कमांडर लेफ्टनंटजनरल उमर अहमद बुखारी यांच्याकडे आहे. त्यांनी लष्करी मुख्यालयाला पत्र देऊन स्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. भारतासोबतचा वाढता तणाव पाकिस्तानी सैन्यासाठी त्रासदायक ठरतो आहे. सैन्याचे कमांडर स्पष्ट आदेश देण्यात अपयशी ठरल्यानं सैनिक द्विधा मनस्थितीत आहेत. त्यामुळे तणाव आणखी वाढला आहे. एका कोअरकडून दुसऱ्या कोअरला रिपोर्टिंग करण्याचे आदेश दिले जात आहेत. अधिकारी आणि सैनिकांच्या तडकाफडकी बदल्या केल्या जात आहेत. त्यामुळे सैन्यात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. गेल्याच आठवड्यात भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी लष्करी मुख्यालयानं क्वेटा आणि बलुचिस्तानातील तैनात १२ व्या कोअरसह अन्य कोअरच्या सैन्य अधिकारी आणि सैनिकांना ११ व्या कोअरला रिपोर्ट करण्याचे तातडीचे आदेश काढले. ११ व्या कोअरचे कमांडर लेफ्टनंट जनरल उमर अहमद बुखारी आहेत. त्यांच्याकडे भारत-पाकिस्तान सीमेच्या सुरक्षेची प्राथमिक जबाबदारी आहे. बुखारी २०२४ पासून या कोअरचं नेतृत्व करत आहेत. २६ एप्रिल २०२५ रोजी त्यांनी अन्य कोअरमधून आलेल्या सैनिकांच्या स्थितीचा आढावा घेतला. तेव्हा त्यातून धक्कादायक तपशील समोर आला. जवळपास ५०० सैनिक आणि १०० अधिकाऱ्यांनी त्यांचे राजीनामे पाठवले होते. त्यामुळे ११ व्या कोअरमध्ये मनुष्यबळाची मोठी कमतरता निर्माण झाली.

Related Post