Mon Nov 17 19:42:56 IST 2025
अमरावती : भारताचे मा. सरन्यायाधीश भूषण गवईजी यांच्या प्रमुख उपस्थितीत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'स्व. रा. सू. (दादासाहेब) गवईजी' यांच्या पुतळ्याचे अनावरण व स्मारकाचे लोकार्पण संपन्न झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादासाहेब गवई यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली तसेच त्यांच्या स्मारकाच्या कामाचे कौतुक करताना मुख्यमंत्री म्हणाले की, स्मारकात जी 'Viewing Gallery' आहे, जिथे दादासाहेब यांचा संपूर्ण इतिहास दुर्मिळ छायाचित्रांसहित पाहायला मिळत आहे, तसेच दृकश्राव्य माध्यमातून किओस्क तयार केल्याने त्यांचा जीवनपट पाहायला मिळत असून, कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर करून दादासाहेब यांची निवडक भाषणे त्यांच्याच आवाजात आपण ऐकू शकतो, अशा विविध उत्तम कार्यामुळे अतिशय उत्तुंग आणि गुणवत्तापूर्ण असे स्मारक तयार झाले आहे.
दादासाहेब 1998 साली अमरावतीचे खासदार झाले, शिवाय महाराष्ट्र विधानसभेतील सदस्य, विरोधी पक्षनेते, उपसभापती, सभापती, अशा अनेक भूमिका दादासाहेब गवईजी यांनी उत्तमरीत्या पार पाडल्या. त्यांच्या निर्णयावर सगळ्यांचा विश्वास होता, कारण ते नेहमी पक्षीय भूमिकेच्या पलीकडे राहिले. असे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दादासाहेब गवईजी यांच्यावर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा पगडा होता आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या धम्माचा त्यांना आशीर्वाद होता, त्यामुळे त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य केले, समाजातले दोष दूर करण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले, भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या समतेच्या विचारांचे समर्थन करून जातीप्रथा संपुष्टात आणण्याच्या विचारांचा त्यांनी पुरस्कार केला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दादासाहेब यांचे सर्व गुण हे त्यांचे सुपुत्र सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवईजी यांच्यात आलेले दिसतात. कारण वकील ते मुख्य न्यायमूर्ती या प्रवासात ते कधीच बदलले नाहीत आणि माणुसकीच्या भावनाने सर्वांना त्यांनी वागवले. गवई कुटुंबाला लोकांचे प्रेम हे भरभरून मिळाले आहे, त्यांनी अनेक माणसे कमावली, त्यामुळे गवई कुटुंब हे खर्या अर्थाने अरबपती आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.