चंद्रपूरमध्ये भाजप- ठाकरेंची शिवसेना एकत्र, भाजपचा महापौर, विदर्भातील युतीचे हादरे महाराष्ट्राच्या राजकारणात बसणार?

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2026-02-10 18:49:35
img

चंद्रपूर महानगरपालिकेत महापौर पदाच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र आले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रपूरमध्ये भाजपला महापौर पद मिळेल तर ठाकरेंच्या शिवसेनेला स्थायी समिती मिळणार आहे. काँग्रेसनं देखील ठाकरेंच्या शिवसेनेला स्थायी समिती देऊ केली होती.

मात्र, पाच वर्षात महापौरपद मिळणार नसल्यानं भाजपसोबत जाणार असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी म्हटलं. चंद्रपूर मधील या सर्व घडामोडींवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रपुरात ठाकरे सेनेचा भाजपला पाठिंबा ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करणार, असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान, चंद्रपूरमध्ये भाजपच्या संगीता खांडेकर महापौर झाल्या आहेत, त्यांनी काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांचा पराभव झाला आहे. संगीता खांडेकर यांना 32 तर वैशाली महाडोळे यांना 31 मतं मिळाली.

चंद्रपूर महानगरपालिकेत ठाकरे सेनेचा भाजपला पाठिंबा ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करणारी आहे, अशी पहिली प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. ठाकरे सेनेसोबत वंचितचेही दोन नगरसेवक भाजपसोबत जाणार असल्याची माझी प्राथमिक माहिती असल्याचं त्यांनी म्हटलं. अंतर्गत गटबाजीचा आम्हाला फटका बसतोय हे निश्चित आहे, असं देखील हर्षवर्धन सपकाळ यांची चंद्रपूर घडामोडींवर पहिली प्रतिक्रिया देताना म्हटलं. दरम्यान, चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत गेल्यानं महाराष्ट्रातील आगामी काळातील उर्वरित जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक, राज्यसभा निवडणूक, विधानपरिषद निवडणूक यावर परिणाम होऊ शकतो. राज्यसभेवर मविआच्या आमदारांच्या संख्या बळातून एक खासदार जाऊ शकतो, त्यावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. याशिवाय उद्धव ठाकरे पुन्हा विधानपरिषदेवर जाणार असल्यास त्यांना मविआतील मित्रपक्षांची गरज लागू शकते.

Related Post