Thu Oct 02 14:28:48 IST 2025
नागपूर : आग्याराम देवी हे जागृत देवस्थान आहे. या मंदिरात नवरात्रोत्सवात देवीच्या नऊ प्रतिमा दिसणार आहेत.
आग्याराम देेवी मंदिर जीर्णोद्वारानंतर आणखी झळाळून निघाले आहे.८५ किलो चांदीच्या सिंहासनात आरुढ देवीची मूर्ती आणखी विलोभनीय दिसून पडते.या वर्षी आग्यारम देवी नवरात्र सोमवार दिनांक २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर पर्यंत साजरा होणार असून, या वेळी नवरात्रीच्या नऊ दिवस देवीच्या नऊ प्रतिमा या भाविकांसाठी विशेष आकर्षण असणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत आग्यारात देवी ट्रस्टचे सचिव महेशकुमार गोयल यांनी दिली. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष विनोद आष्टीकर,उपाध्यक्ष गिरजाशंकर अग्रवाल,कोषाध्यक्ष हरिओम अग्रवाल,माजी अध्यक्ष व सदस्य माजी आमदार गिरीश व्यास,सदस्य रामचंद्र पिल्लारे,सुरेश तिवारी व विकास पेटकर उपस्थित होते. गाेयल यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा अखंड मनोकामना ज्योत ही तांब्याचे कळस व दिपकच्या स्वरुपात असणार आहे.या वेळी देखील तीन हजार मनोकामना ज्योत असणार आहेत.या मंदिराला ऐतिहासिक महत्व असून, या मंदिराला तीनशे वर्षांचा भोसलेकालीन इतिहास आहे.तत्कालीन राजा भोसले हे भ्रमणासाठी बाहेर जाताना आधी याच मंदिरातील देवीची पूजा अर्चना करीत असत,इतकंच नव्हे तर परत आल्यानंतर देखील आधी देवीचे दर्शन घेत होते.या देवीला नगर देवीचा दर्जा प्राप्त होता.
दरवर्षीप्रमाणे यंदा देखील नवरात्रात देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी असणार आहे.भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.पोलिस आयुक्त तसेच वाहतूक पोलिस येत्या दोन दिवसात नेहमीसारखेच मंदिर परिसराचा दौरा करणार आहेत.२२ स्वच्छता सेवक हे सातत्याने गर्भगृह व परिसराची स्वच्छता करणार आहेत.१८ सीसीटीव्ही कॅमरातून सातत्याने संपूर्ण व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.प्रवेशद्वारावरच भाविकांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात अाली आहे.नवरात्रीत केवळ गायत्री शयनाच्यावेळी मंदिर बंद असेल.सकाळी ६.३० वाजता आरतीनंतर मंदिर खुले होईल तसेच सांयकाळी १०.३० पर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहील. महिलांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षा रक्षक राहणार असून, प्रत्येक ट्रस्टी दोन-दोन पाळीत देखरेख ठेवणार आहे.दिव्यांगाना रांगेत उभे राहण्याची गरज नसून गर्भगृहात मागून प्रवेश देण्यात येईल.अन्नकुट व छप्पनभोग सोहळा गुरुवार दिनांक ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता असणार आहे. नवमी हवन पूजन बुधवार दिनांक १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते १२.३० वा.दरम्यान होईल.कन्याभोजन १ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता पार पडेल.घटविसर्जन १ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० ते ५ वा.दरम्यान मंदिर प्रांगणात होईल.महाप्रसादाचे आयोजन ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ ते १० वा.दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.नवरात्री महोत्सवात दररोज देवीची आरती सकाळी १० वाजता तसेच रात्री ८ वाजता होईल.याशिवाय दररोज विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मंदिरातर्फे सर्वोच्च न्यायालय,उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस,आमदार प्रवीण दटके,कृष्णा खोपडे,मोहन मते,विकास ठाकरे तसेच नितीन राऊत यांच्यासह सर्व आजी-माजी आमदार यांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे. अधिकाधिक भाविकांनी दरवर्षीप्रमाणे दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आग्याराम देवी ट्रस्टच्या सर्व पदाधिका-यांनी केले आहे.