Mon Jun 16 22:52:44 IST 2025
नागपूर : बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात सायबर पोलिसांनी पाच शिक्षकांचे बनावट आयडी तयार करून त्यांच्या १० वर्षांच्या अरियर्सची रक्कम हडपणाऱ्या मोहपा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व भाजपाचे धापेवाड्याचे माजी पंचायत समिती सदस्य दिलीप भास्करराव धोटे (६२) यांना अटक केली.
धोटे अध्यक्ष असलेल्या संस्थेच्या कळमेश्वर तालुक्यात प्रतिभा उच्च प्राथमिक शाळा (मोहपा) व धापेवाडा पब्लिक स्कूल अशा दोन शाळा आहेत. बोगस शालार्थ घोटाळा प्रकरणात संस्था चालकांना अटक करण्यात आली. थोटे यांना अटक झाल्यानंतर शनिवारी जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. यामुळे शालार्थ आयडी घोटाळ्यात बोगस नियुक्त्या करून कोट्यवधींची माया जमवणाऱ्या संस्था चालकांना घाम फुटला आहे. दोन दिवसांपूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस आयुक्तांकडे काटोल तालुक्यातील दोन राजकीय नेत्यांच्या पत्नींची नियुक्ती बोगस असल्याची तक्रार केली होती. सत्र सुरूच असून, एसआयटी स्थापन झाल्यानंतर पोलिसांनी गोंदियातील संस्था चालकाला अटक केली होती. त्यानंतर शनिवारी सायबर
पोलिसांनी दिलीप धोटे यांना ५ शिक्षकांचा बोगस आयडी तयार केल्याप्रकरणी अटक केली आहे. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप धोटे यांनी काही वर्षापूर्वी शाळेत ८ शिक्षकांची बोगस कागदपत्रांच्या आधारे नियुक्ती करून अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांचे शालार्थ आयडी तयार केले. या शिक्षकांचे नियमित वेतन काढून अधिकाऱ्यांच्या संगमताने त्यांची महालच्या नवयुवक प्राथमिक शाळेत बदली केली. यातील ५ शिक्षकांचा १० वर्षाचा अरियर्स काढण्यासाठी म्हणजे प्रत्येक शिक्षकांचे १३ ते १४ लाख रुपये काढून देण्यासाठीही त्यांनी शिक्षकांकडून पैसे वसूल केले. यात लाखो रुपयांचा गैरव्यवहार त्यांनी केल्याची माहिती आहे. दिलीप धोटे यांना अटक केल्यानंतर सायबर पोलिसांनी त्यांना सत्र न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.