Thu Jan 01 21:40:06 IST 2026
नागपूर : राज्यभर गाजत असलेल्या बोगस शालार्थ आयडी प्रकरणात अटकेतील आरोपी तत्कालीन शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार, आणि चिंतामण गुलाबराव वंजारी (वय ५७, रा. भाऊसाहेब सुर्वेनगर) तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक लक्ष्मण मंघाम या तिघांचा जामीनअर्ज प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे हे तिघे अद्यापही कारागृहातच आहेत.
वंजारी व जामदार उपसंचालक असताना हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप या दोघांवर आहे. तसेच उल्हास नरड उपसंचालक असताना त्यांच्या सांगण्यावरून मंघामने दोनशेहून अधिक बोगस शालार्थ आयडी तयार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या तिघांवर सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून सायबरने गुन्हा दाखल केला आहे. अलीकडेच एसआयटीने या तिघांना
अटक केली. एसआयटीने तिघांची कसून चौकशी केली असता घोटाळ्याशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांना मिळाली. पुढे या तिघांची कारागृहात रवानगी झाली. शुक्रवारी त्यांनी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयापुढे जामिनासाठी अर्ज केले. मात्र, हे तिघे या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत. तसेच जामदार व वंजारी उच्च पदस्थ असून ते साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतात. या प्रकरणाची व्याप्ती बरीच मोठी असून तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये असा युक्तिवाद सरकारकडून करण्यात आला. यावर न्यायालयाने तिघांचे अर्ज फेटाळून लावले. याप्रकरणात सेवानिवृत्त उपसंचालक सतीश मेंढे यांचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. ते भूमिगत झाल्याचे कळते. हायटेक पोलिसांना ते अद्यापही आढळून आलेले नाहीत. एसआयटीचे एक पथक भंडाऱ्यात तळ ठोकून असल्याची माहिती आहे.