Thu Jan 01 21:42:06 IST 2026
नागपूर : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या चौकशीसाठी स्थापन झालेल्या एसआयटीने बड्या अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास प्रारंभ केला आहे. शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिव वैशाली जामदार यांना अटक करण्यात आली. ज्या कालावधीत हा घोटाळा झाला,
त्यावेळी जामदार जामदार या नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक होत्या. बनावट शालार्थ आयडी तयार करून नोकऱ्या वाटल्याप्रकरणी यापूर्वी शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर माजी उपसंचालक अनिल पारधींचा क्रमांक लागला होता. गुरुवारी विद्यमान उपसंचालक चिंतामण वंजारी कोठडीत गेले आणि शुक्रवारी तत्कालीन उपसंचालक वैशाली जामदार यांना बेड्या ठोकण्यात आल्या.
राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि 'शालार्थ आयडी' घोटाळ्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आतापर्यंत शिक्षण विभागातील आठहून अधिक अधिकारी-कर्मचारी तसेच एका शिक्षकाला अटक करण्यात आली होती. सदर पोलिस ठाण्याच्या पथकाने तीन दिवसांअगोदर लक्ष्मण उपासराव मंघाम (४७, वासंती अपार्टमेंट, आकांशी लेआउट, दाभा) याला अटक केली होती. तो अगोदर शिक्षण उपसंचालक कार्यालयात लिपिक होता. २०१९पासून तो बनावट शालार्थ आयडी तयार करत होता. यासाठी त्याने कार्यालयाच्या बाहेरील कम्प्युटरचा वापर करून दोनशेहून अधिक बनावट शालार्थ आयडी तयार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याच्या चौकशीत त्याने अनेक मोठ्या अधिकाऱ्यांची नावे घेतली. दोन दिवसांतच चिंतामण वंजारी यांना अटक करण्यात आली. तर शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथून वैशाली जामदार यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना चौकशीसाठी नागपुरात आणण्यात येत आहे. या कारवाईमुळे आता शिक्षण विभागातील राज्यभरातील अधिकारी हादरले आहेत. दरम्यान, शुक्रवारी चिंतामण वंजारीला २७ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे.