Tue Jun 17 00:17:35 IST 2025
नागपूर : राज्याला हादरविणाऱ्या शिक्षण विभागातील शालार्थ आयडी घोटाळा व अपात्र मुख्याध्यापक भरती घोटाळा प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीला मोठे यश मिळाले आहे. शालार्थ आयडी घोटाळ्यातील महत्वाची लिंक असलेल्या व प्रत्यक्ष है बनावट आयडी बनविणारा लिपिक लक्ष्मण उपासराव मंधाम याला पोलिसांनी अटक केली आहे.
सायबर पोलिस ठाण्याच्या माहितीवरून सदर पोलिस ठाण्याच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. यासोबतच निवृत्त शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनाही अटक करण्यात आली आहे. पारधी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. नंतर त्यांना अटक करण्यात आली. लक्ष्मण उपासराव मंधाम (४७) हा वासंती अपार्टमेंट, आकांशी लेआउट, दाभा येथे राहतो. तो अगोदर सुरुवात शिक्षण उपसंचालक कार्यालयात लिपिक होता, वर्षभराअगोदर त्याची नागपूर महानगरपालिकेत बदली झाली होती. २०१९ सालापासून तो बनावट शालार्थ आयडी तयार करत होता. यासाठी तो कार्यालयाच्या बाहेरील संगणकांचा वापर करत होता. उपसंचालक उल्हास नरड व वरिष्ठ लिपिक सूरज नाईक यांच्या चौकशीतून त्याचे नाव समोर आले होते. त्याला मंगळवारी सायंकाळी सदर पोलिस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याला सायबर पोलिस ठाण्याच्या हवाली, करण्यात आले असून तेथील पथक त्याची चौकशी करत आहे. त्याला अटक झाल्याने आता उपसंचालक कार्यालयाशी जुळलेल्या व या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या अनेकांना घाम फुटला आहे. मंधाम कुणाच्या इशाऱ्यावरून काम करत होता, हेदेखील त्याच्या चौकशीतून समोर येईल.
शालार्थ आयडी घोटाळ्यात सायबर पोलिस ठाण्याकडून तांत्रिक पद्धतीने तपासावर भर देण्यात आला होता. अस्तित्वात नसलेल्या शिक्षकांच्या नावाने बोगस शालार्थ आयडी करण्यात आले होते व अनेक तयार वर्षांपासून पगाराची उचल सुरू होती. शालार्थ आयडी तयार करण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाच्या बाहेरील संगणकातून झाली असल्याचे सायबर पोलिसांच्या तपासातून समोर आले होते. चौकशीतून मंघामचे नाव समोर आले होते. मंधाम हा या गुन्ह्यातील महत्त्वाची लिंक असून तो शहराबाहेर पळून जाणार असल्याची माहिती पोलिस कर्मचारी प्रलेश कापसे व सुशील श्रीवास यांना प्राप्त झाली. पोलिसांनी तातडीने त्याचा पाठलाग सुरू केला. मंधाम कारने शहराबाहेर जात असताना वाडी येथील आठया मैल येथे त्याला ताब्यात घेण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे, नीलेश घोगरे, प्रलेश कापसे, सुशील श्रीवास, दुर्गेश ठाकूर, मोहनसिंग ठाकूर, नीलेश लोदे, ज्ञानेश्वर वाकुडीकर, सचिन कावळे, रूपेश हिवराळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, माजी उपसंचालक वैशाली जामदार यांच्यावरही अटकेची टांगती तलवार असल्याची माहिती आहे. पोलिस त्या दिशेने तपास करीत आहेत.