Thu Jan 01 21:38:38 IST 2026
मौदा : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर जिल्ह्यातच महसुलाची सर्रास लूट सूरु आहे. मौदा येथील माथनी वाळू डेपोत नियमबाह्य कामे सुरू असून शासनाला लाखोंचा तोटा होत आहे.
मौदा माथनी (ता. मौदा) येथील रेतीडेपोत मालकाकडून शासकीय नियमांचे वारंवार उल्लंघन होताना दिसून आले आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकारी सचिन गोसावी आणि तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांनी प्रत्यक्ष या डेपोची पाहणी करीत खातरजमा केली. त्यानंतर त्यांनी डेपो मालकास नियमांचे काटेकोर पालन करण्याची सूचना करीत उल्लंघन केल्यास डेपो रद्द करण्याचा इशारा दिला. राज्य सरकारने लिलावात माथनी रेतीडेपो पुरोहित नामक व्यक्तीला दिला आहे. त्यांनी उपसा केलेली घाटातील रेती डेपोत आणण्यासाठी किमान ६० ट्रॅक्टर भाड्याने घेतले आहे. त्यातील बहुतांश ट्रॅक्टरची कागदपत्रे त्यांच्या मालकांकडे नाहीत. ट्रॅक्टरमधील रेतीचे डेपोत वजन केले जात नाही. यातील कोणत्याही ट्रॅक्टरवर जीपीएस सिस्टम लावलेले नाही, यासह इतर बाबी पाहणीत उघड झाल्या आहेत. उपविभागीय अधिकारी सचिन गोसावी यांनी काही ट्रक व ट्रॅक्टर चालकांना पुरोहित समोर त्यांच्या वाहनांच्या कागदपत्रांविषयी विचारणा केली. यातील कुणीही त्यांना कागदपत्रे दाखविली नाही. पुरोहित म्हणजेच डेपोमालक समोर असल्याने चालक सत्य बोलण्याचे धाडस करीत नव्हते.
विभागाचे मंडळ अधिकारी अनिल भगत ग्राम महसूल अधिकारी तुषार इडपाते उपस्थित होते. डेपोतील चालक व कामगारांसमक्ष या कर्मचाऱ्यांनी रेती साठ्याचा पंचनामा करून अहवाल यार केला. 66 डेपो मालकाने नियम व आदेशानुसार रेती उपसा व विक्रीचे काम न केल्यास डेपो बंद केला जाईल. आम्ही डेपोची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात काही संशयास्पद बाबी आढळून आल्या. या पाहणी व पंचनाम्याचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात येईल. घाट बंद करण्याची सूचना अहवालात केली आहे, असे उपविभागीय अधिकारी सचिन गोसावी यांनी सांगितले. पुरोहित रेतीविक्रीत प्रतिब्रास ५०० रुपये अधिक घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सिद्ध होताच डेपोमालकावर कठोर कारवाई केली जाईल, असे मौदा तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांनी सांगितले.