Thu Jan 01 21:46:10 IST 2026
नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
वाढत्या वयोमानामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. मागील महिन्यांतही त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते. दिल्लीतील अपोलो रुग्णालयात न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनित सुरी यांच्या देखरेखीखाली लालकृष्ण अडवाणी यांना ठेवण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्या प्राथमिक तपासण्या करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.
गेल्या काही वर्षांपासून लालकृष्ण अडवाणी त्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव सक्रीय राजकारणापासून अलिप्त आहेत. नुकताच त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. अडवाणी यांच्या निवासस्थानीच पुरस्कार सोहळा संपन्न झाला होता.