Thu May 01 15:54:40 IST 2025
नवी दिल्ली : देशात दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी करणे व प्रत्येक बूथवरील किमान एकाला अयोध्येत नेऊन रामललाचे दर्शन घडविणे, असा आराखडा तयार करून सत्तारूढ भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वी अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाचा विषय तापवत नेण्याचा मेगा प्लॅन आखला आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील आयोगाच्या आकडेवारीनुसार देशात १० लाख ३५ हजार मतदान केंद्रे होती व दुर्गम अपवाद वगळता बहुतेक केंद्रांतर्गत किमान २ व त्यापेक्षा जास्त बूथ असतात. लोकसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण देश किमान हिंदी पट्टा राममय करण्यासाठी भाजपने जंगी रणनीती आखली आहे. दुसरीकडे अयोध्येला देशातील सर्वांत स्वच्छ शहर बनविण्याचा विडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळ भूमीतून बुधवारीच उचलला आहे. मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारीला अयोध्येतील मंदिरात राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल तेव्हा देशातील प्रत्येक गावात दिवाळी साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पक्षाध्यक्ष जेपी नड्डा, संघटनमंत्री संतोष, गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी भाजप नेत्यांची जी मॅरेथॉन बैठक झाली त्यातील हा दुसरा पैलू समोर आला आहे.
यानुसार भाजप कार्यकर्त्यांना गावोगावी एक पुस्तिका वितरित करण्यास सांगण्यात येणार आहे. या पुस्तिकेत राम मंदिर आंदोलनातील संघ-भाजप नेत्यांची भूमिका आणि राममंदिराच्या मार्गात काँग्रेससह विरोधकांनी निर्माण केलेल्या अडथळ्यांचा ठळक उल्लेख असेल. प्रत्येक बूथवरून किमान एका व्यक्तीला रामलल्लाचे दर्शन घेता यावे यासाठी पक्षाने तयार केलेल्या योजनेत दक्षिणेकडील राज्यांतील जास्तीत जास्त लोकांचा समावेश करा, असे भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने निर्देश दिले आहेत. यंदा लोकसभा निवडणुकीपूर्वी लाखो लोकांनी राममंदिराला भेट द्यावी व दर्शनानंतर आपापल्या भागात (अर्थात भाजपचा) प्रचार करावा अशीही पक्षाची रणनीती आहे. लोकांना रामललाचे दर्शन घेता यावे यासाठी देशातील ४३० शहरांमधून दररोज पाच ते पस्तीस गाड्या धावतील. २३ जानेवारीपासून भाजपच्या मदतीने दररोज किमान ५० हजार भाविक रामललाचे दर्शन घेणार असल्याचे नियोजनही भाजपने केले आहे.