Mon Nov 17 19:44:20 IST 2025
नागपूर : गोविंदबागेतला यंदाचा दिवाळी पाडवा चर्चेत आहे तो अजित पवारांच्या (Ajit Pawar) दांडीमुळे. पवार कुटुंबाच्या दिवाळी पाडवा सेलिब्रेशनमध्ये अजितदादांनी येणं टाळलं. दादांनी येणं टाळलं असंच म्हणावं लागेल.
दरवर्षी दिवाळी पाडव्याला गोविंदबागेत पवार कुटुंब बारामतीकरांची (Baramati) भेट घेतं.. सकाळी लवकर शरद पवारांसह (Sharad Pawar) अवघं पवार कुटुंब बारामतीकरांशी संवाद साधतं. याही वर्षी शरद पवार, सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा स्वीकारल्या. अजित पवार काटेवाडीत मुक्कामी आहेत. काटेवाडीत लोकांच्या भेटीगाठी ते घेतायत. अगदी किल्ले स्पर्धेलाही त्यांनी भेट दिली. इतकंच काय तर बारामतीतल्या शारदोत्सव कार्यक्रमालाही मास्क घालून दादा आले होते. इतकं असूनही पवार कुटुंबाच्या गोविंदबागेतल्या कार्यक्रमाला येणं मात्र दादांना जमलं नाही! त्यामुळे अजितदादांच्या अनुपस्थितीची चर्चा सुरु आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर पवार कुटुंबाची पहिलीच दिवाळी आहे. आणि या दिवाळीत पवार कुटुंबिय एकत्र आल्याचं दिसून येतंय. एकीकडे दादांच्या अनुपस्थितीची चर्चा असताना दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार मात्र गोविंदबागेतल्या कार्यक्रमात उपस्थित होत्या तर दादांचे पुत्र पार्थ पवार यांनीही शरद पवारांची भेट घेत आशीर्वाद घेतले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी दिवाळीनिमित पवार कुटुंबाचे फोटो शेअर केले आहेत. यात खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार कुटुंबियांसोबत एकत्र दिसत आहेत.