जनुकीय शास्त्र व जनुकीय आजारांबाबत जनजागृती आवश्यक : डॉ.शुभा फडके

jitendra.dhabarde@gmail.com 2023-01-06 12:21:52
img

नागपूर : आपल्या देशात तसेच देशाबाहेरही जनुकीय वैद्यक शास्त्र आता विकसित होत आहे. तथापि याशास्त्रामुळे निर्माण होणाऱ्या वैद्यक उपचार सुविधांबाबत तसेच जनुकीय आजारांबाबत जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. शुभा फडके यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले.

डॉ. शुभा फडके या संजय गांधी पोस्ट ग्रॅड्युएट इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस, लखनऊ येथे प्राध्यापक व जनुक वैद्यक शास्त्राच्या विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्या मुळच्या नागपुर येथील रहिवासी आहेत. भारतीय विज्ञान काँग्रेसनिमित्त डॉ. फडके ह्या येथे आल्या आहेत. त्यानिमित्त त्यांनी पत्रकारांशी माध्यम दालनात येऊन संवाद साधला. आपल्या संबोधनात डॉ. फडके म्हणाल्या की, जनुकीय वैद्यक शास्त्रात गेल्या काही दशकात खूप प्रगती झाली आहे. त्यामुळे गर्भावस्थेत चाचण्यांद्वारे जन्माला येणाऱ्या बाळामध्ये असणाऱ्या जनुकीय आजारांचे निदान होऊ शकते. असे जनुकीय आजार जवळपास सहा हजार आहेत. अर्थात ह्या चाचण्या व त्यावरील उपचार सध्यातरी महाग आहेत. सरकारने यासंदर्भात धोरणे आखली असून शासनाच्या पुढाकाराने चाचण्या व उपचार सामान्यांच्या आवाक्यात येणे शक्य झाले आहे. हिमोफिलिया,सिकलसेल, थॅलेसेमिया यासारख्या जनुकीय दोषांमुळे होणाऱ्या रक्त्तविकारांवरील उपचार, चाचण्या तर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत करण्यात येत आहेत.

जनुक वैद्यक शास्त्रामुळे प्रसवपूर्व चाचण्यांद्वारे जे काही परिणाम येतात, त्यानुसार पालकांकडून घेतले जाणारे गर्भपाताचे निर्णय, गर्भपाताबाबत भारतात असणारे कायदे, सरोगसी इ. संदर्भात काही अनैतिक व्यवहार, शोषण इ. होण्याची शक्यता लक्षात घेता यासंदर्भात अधिक जनजागृती होणे आवश्यक आहे. जनुकीय शास्त्राची साक्षरता वाढणे आवश्यक आहे, असे मत डॉ. फडके यांनी व्यक्त केले. जनुकीय वैद्यक शास्त्रासंदर्भात जनजागृती होऊन त्याचा उपयोग हा जटील आजारांचे निदान लवकर करणे व लवकर उपचार सुरु करणे याबाबत व्हावयास होणे अपेक्षित आहे. त्यासाठी बालरोगतज्ज्ञांना प्रशिक्षीत केले जात आहे. प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत प्रशिक्षण पोहोचविले जात आहे, असेही डॉ. फडके म्हणाल्या.

Related Post