Fri Aug 01 23:17:28 IST 2025
नागपूर : विज्ञानाच्या सहय्याने शाश्वत विकासाचे ध्येय प्राप्त करण्यात महिलांचे योगदान महत्वपूर्ण आहे. महिलांनो आता स्वयंस्फूर्तीने विज्ञानक्षेत्रात भरारी घ्या आणि आकाश कवेत घ्या,असे आवाहन वैज्ञानिक डॉ. निशा मेंदरत्ता यांनी आज महिला विज्ञान काँग्रेसच्या उद्घाटन प्रसंगी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात सुरु असलेल्या 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये आज महिला विज्ञान काँग्रेसचा उद्घाटन सोहळा पार पडला. वैज्ञानिक डॉ. निशा मेंदरत्ता, पद्मश्री राहीबाई पोपेरे,भारतीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ.विजयलक्ष्मी सक्सेना, महासचिव डॉ.एस.रामकृष्ण, उद्योजिका कांचन गडकरी,कुलगुर डॉ. सुभाष चौधरी आणि महिला विज्ञान काँग्रेसच्या संयोजक डॉ.कल्पना पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ.निशा मेंदिरत्ता म्हणाल्या, कुटुंब,समाजाबरोबरच देशविकासात महिलांची भूमिका महत्वाची आहे. वर्तमानस्थितीत शिक्षणात मुली आपली योग्यता सिद्ध करीत आहेत. महिलांना विज्ञान क्षेत्रात प्रगती करण्यासाठी पोषक वातावरण व दृष्टीकोन तयार होत आहे. विज्ञानक्षेत्रातही महिलांना प्रोत्साहनाची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले. देशात विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीत महिलांचे योगदान 18 टक्के असून हे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. महिलांनी स्वयंस्फूर्तीने विज्ञानाकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.
राहीबाई पोपेरे यांनी स्वानुभव कथन करत असंख्य अडचणींवर मात करून महिला आपल्या कार्याचा ठसा उमटवू शकतात असा आशावाद मांडला. दुर्गमभागातील वास्तव्य, शिक्षणासह सोयीसुविधांचा अभाव असतांना 22 वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयासातून निर्माण केलेली 153 वाणांच्या बियाण्यांची बँक हा प्रवास त्यांनी मांडला. घरोघरी बीजमाता राहीबाई निर्माण व्हाव्या आणि गावोगावी बियाण्यांच्या बँक तयार व्हाव्या, असे आवाहन त्यांनी उपस्थित महिलांना केले. कांचन गडकरी यांनी मातृसत्तेचे व महिलांचे समाजाती महत्वाचे स्थान अधोरेखित करत, महिलांनी येणाऱ्या पिढ़्यांकडे वैज्ञानिक दृष्टीकोन संक्रमित करण्याचे आवाहन केले. डॉ. कल्पना पांडे यांनी महिला विज्ञान काँग्रेसच्या मंचाहून महिलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन व शाश्वत विकासातील सहभाग वाढेल, असा आशावाद मांडला. डॉ.एस.रामकृष्ण यांनी स्वागतपर भाषण केले.