Wed Oct 07 17:20:20 IST 2026
नागपूर : महाराष्ट्र विधानपरिषद नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस तथा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अँड अभिजित वंजारी यांच्या प्रचाराचा शुभारंभ सोमवारी (५ ऑक्टोबर) जवाहर विद्यार्थी गृह, सिव्हिल लाईन्स येथे करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, गटनेते तथा ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा साकोलीचे आमदार नाना पटोले, माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री अनिल देशमुख, गडचिरोलीचे खासदार नामदेव किरसान, रामटेकचे खासदार श्याम कुमार बर्वे, भंडारा-गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे, माजी मंत्री रणजीत कांबळे, राजेंद्र मुळक, अनिस अहेमद, पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे, आमदार सुधाकर अडबाले, आरमोरीचे आमदार रामदास मसराम यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव गिरीश पांडव, प्रवक्ते अतुल लोंढे, सुरेश भोयर, सलील देशमुख, शेखर शेंडे, नाना गावंडे, नागपूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक पुरुषोत्तम हजारे, अतुल कोटेचा, वसीम शेख, अभिजित झा, सुहास नानवटकर, सर्व ब्लॉक अध्यक्ष, महिला काँग्रेसच्या पदाधिकारी तसेच नागपूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांच्यासह वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थित नेत्यांनी नागपूर विभागातील पदवीधर मतदारांचे प्रश्न आणि हक्क विधानपरिषदेत मांडण्यासाठी अँड. अभिजित वंजारी यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. पदवीधर, युवक, शिक्षण आणि रोजगाराशी संबंधित प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी व्यापक जनसंपर्क अभियान राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. नागपूर विभागातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रचारात सहभागी होऊन अँड. अभिजित वंजारी यांच्या प्रचारासाठी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प केला. प्रचाराच्या शुभारंभामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, ॲड. अभिजित वंजारी यांनी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून नामांकनपत्र दाखल केले आहे.