Tue Jun 02 22:07:31 IST 2026
नागपूर : मध्य भारतातील रेल्वे संपर्क बळकट करण्याच्या दिशेने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने नियमित 11203/11204 नागपूर–मडगाव एक्सप्रेस सेवेच्या उद्घाटन द्वारे ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. पूर्वी 01139/01140 नागपूर–मडगाव विशेष गाडी म्हणून चालविण्यात येणाऱ्या या रेल्वे सेवेचे रेल्वे बोर्डाने नियमितीकरण केले असून विदर्भ आणि कोकण-गोवा पट्ट्यातील थेट व सुधारित रेल्वे संपर्काची दीर्घकालीन मागणी पूर्ण झाली.
आज नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर आयोजित उद्घाटन समारंभात मा. केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी यांनी दुपारी 15:05 वाजता हिरवा झेंडा दाखवून गाडी रवाना केली. यावेळी WSSC बालक मंदिर च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रंगतदार सांस्कृतिक नृत्याविष्काराने कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. या समारंभास रामटेक लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार श्री. श्यामकुमार बर्वे , राज्यसभा खासदार श्रीमती माया इवनाते , नागपूर मध्यचे आमदार श्री प्रवीण दटके, नागपूर महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती नीता ठाकरे, वरिष्ठ रेल्वे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते. नियमित रेल्वे सेवा वेळापत्रक गाडी क्रमांक 11203 नागपूर–मडगाव द्विसाप्ताहिक एक्सप्रेस 16 मे 2026 पासून प्रत्येक बुधवार आणि शनिवार रोजी नागपूरहून दुपारी 15:05 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी 17:45 वाजता मडगाव येथे पोहोचेल. गाडी क्रमांक 11204 मडगाव–नागपूर द्विसाप्ताहिक एक्सप्रेस 17 मे 2026 पासून प्रत्येक गुरुवार आणि रविवार रोजी मडगावहून 20:00 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी 21:25 वाजता नागपूर येथे पोहोचेल.
थांबे: वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमळी. नागपूर–मडगाव एक्सप्रेसचे नियमितीकरण हे महाराष्ट्र आणि गोवा यांमधील रेल्वे संपर्क मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे पर्यटन, व्यापार आणि प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना मिळेल तसेच विदर्भ, कोकण आणि गोवा येथे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक सुविधा मिळतील. मध्य रेल्वे प्रवासी सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि वाहतूक पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहे. प्रसिद्धी पत्रक क्रमांक: 2026/05/20 हे प्रेस निवेदन मध्य रेल्वे, नागपूर विभागाच्या जनसंपर्क विभागामार्फत जारी करण्यात आले आहे