Mon Nov 17 17:46:54 IST 2025
MPSC Result 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर झाला आहे. मुख्य परीक्षा आणि मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा हा निकाल प्रसिद्ध करण्यात आला. या निकालात सोलापूर जिल्ह्यातील विजय नागनाथ लमकणे यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर हिमालय घोरपडे यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे.
तसेच नागपूरची प्रगती जगताप हिने अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातून राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी (Merit List) तसेच पात्रता गुण जाहीर करण्यात आले आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षा एमपीएससीतर्फे 27 ते 29 मे 2024 दरम्यान घेण्यात आली होती. या परीक्षेनंतर पात्र ठरलेल्या 1,516 उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया 30 ऑक्टोबरपर्यंत पार पडली. त्यानंतर आयोगाने रात्री उशिरा निकाल जाहीर केला. एकूण 7,970 उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी 7,732 उमेदवारांनीच मुख्य परीक्षेसाठी अर्ज सादर केला. विविध तांत्रिक कारणांमुळे काही उमेदवारांना अर्ज सादर करण्यात अडचणी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर एमपीएससीने अर्जप्रणाली खुली ठेवत उर्वरित पात्र उमेदवारांना संधी दिली होती.
एमपीएससीने स्पष्ट केले आहे की, हा निकाल आरक्षण, समांतर आरक्षण आणि अन्य न्यायालयीन प्रकरणांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुख्य परीक्षेत अपात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची फेरपडताळणी हवी असल्यास, गुणपत्रक मिळाल्याच्या तारखेपासून दहा दिवसांच्या आत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.