Thu Jan 01 23:18:32 IST 2026
नागपूर : केवळ महाराष्ट्रच नव्हे तर मध्य भारताच्या अनेक राज्यांचे विश्वासार्ह, खात्रीलायक, किफायतशीर उपचाराचे केंद्र असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी) अमृत महोत्सवासाठी सज्ज झाले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येत्या १ डिसेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (जीएमसी) अमृत महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
आज या संदर्भातील पत्रकार परिषदेत अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी १ डिसेंबर व वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली. राज्यपाल रमेश बैस,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडणार असून महाविद्यालयाशी संबधित चार मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. जीएमसीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या मैदानावर १ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते डाक तिकीट कव्हरपेजचे अनावरण होणार आहे. जीएमसीच्या दोन नवनिर्मित सभागृहांचे डिजीटल उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे. तसेच जीएमसीतून उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी डॉ. बी. जे. सुभेदार, जीएमसीसाठी जमीन दान करणारे कर्नल कुकडे यांचे नातू ॲड.दिनकर कुकडे आणि या महाविद्यालयाला मदत करणाऱ्या डॉ. शकुंतला गोखले यांचे नातेवाईक व डॉ. प्रमोद गिरी यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार होणार आहे. या कार्यक्रमातच राज्यपालांच्या हस्ते जीएमसीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे तसेच कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात येणार असल्याचे डॉ. गजभिये यांनी सांगितले. या उद्घाटन समारंभाच्या दिवशी जीएमसीमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची कसोसीने काळजी घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अमृत महोत्सवाच्या उदघाटनानंतर जीएमसीच्या विविध विभागांमध्ये पुढील १५ दिवस परिसंवाद, कार्यशाळा, चर्चासत्र आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या समारंभाची सांगता २२ व २३ डिसेंबर २०२३ रोजी देश-विदेशात विविध क्षेत्रात कार्यरत जीएमसीच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याने होणार आहे. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणाऱ्या उद्घाटन समारंभाची सुरुवात व सांगता राष्ट्रगीताने होणार असून कामठी मिलेट्री बँड हे सादरीकरण करणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जीएमसीला भेट देणाऱ्या तिसऱ्या राष्ट्रपती ठरणार आहेत. यापूर्वी देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते १९५३ मध्ये जीएमसीचा उदघाटन समारंभ पार पडला. तर १९९५ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाल शर्मा यांच्या हस्ते जीएमसीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन पार पडले.