Thu May 01 15:53:23 IST 2025
नवी दिल्ली : आमचा एक सैनिक मारला गेला तर त्या बदल्यात आम्ही भारताचे तीन सैनिक मारू, अशी धमकी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असीफ यांनी दिली आहे. जर युद्ध छेडण्यात आले तर भारताला त्याचे भयानक परिणाम भोगावे लागतील, असे सांगत ख्वाजा असीफ यांनी भारताला ही धमकी दिली.
शुक्रवारी पाकिस्तानी संसदेत बोलत असताना त्यांनी भारताविरोधात ही गरळ ओकली. तर दुसरीकडे पाकिस्तानकडून सीमारेषेवरील दहशतवादी कारवाया आणि सततच्या गोळीबाराला भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने बॅकफुटवर येत भारतासोबत बोलणी वाढू असेदेखील म्हटले. शुक्रवारी पाकिस्तानमधील संसदेत संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ आणि पंतप्रधान नवाज शरीफ यांचे परराष्ट्र धोरण व सुरक्षा विषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी आता भारतासोबत संवाद वाढवण्यावर भर देऊ, असे सांगितले. पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर एकीकडे पाकिस्तानने भारतासमोर गुडघे तर टेकले. मात्र, सुधारायचेच नाही अशी भूमिका स्वीकारलेल्या पाकिस्तानकडून भारताला धडा वगैरे शिकवू अशा धमक्यादेखील दरदिवशी नव्याने दिल्या जात आहेत.
पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या माहितीनुसार, ख्वाजा असिफ आणि सरताज अझीझ या दोघांनी पाकिस्तानच्या संसदेत सांगितले की, पाकिस्तानी सरकारने सीमारेषेवरील भारताकडून होणा-या कारवाईचा मुद्दा या आधीचा संयुक्त राष्ट्राकडे मांडला आहे. याव्यतिरिक्त, भारतावर दबाव निर्माण करण्यासाठी अन्य देशांकडूनही मदतीची मागणी केली जात आहे. मात्र, पाकिस्तानने भारताविरोधात कठोर पाऊल उचलू नये, असे केल्यास भारताला पाकिस्तानविरोधात आवाज उठवण्यासाठी आणखी एक संधी मिळेल, असे मत काही पाकिस्तानी खासदारांनी व्यक्त केले.