Thu Jan 01 21:43:18 IST 2026
पुणे : 'ख्वाडा' आणि 'बबन' या सिनेमांच्या अभूतपूर्व यशानंतर रोमँटिक आणि आशयघन कथा घेऊन दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचा 'टीडीएम' सिनेमा २८ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमातून पृथ्वीराज थोरात आणि कालिंदी निस्ताने हे दोन नवे चेहरे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहेत.
मराठी सिनेरसिकांना 'टीडीएम'ची प्रतिक्षा लागली असताना दिग्दर्शक भाऊरावांनी या सिनेमाबद्दल काही पडद्यामागच्या गोष्टींचा खुलासा केला आहे. 'टीडीएम'चे शूटिंग कसे झाले आणि त्याचे अहमदनगर कनेक्शन काय आहे? याबद्दल भाऊराव बोलले आहेत. 'टीडीएम'मधील कथेबद्दल सांगताना भाऊराव म्हणाले, "हा सिनेमा मातीतला आहे. प्रत्येक घरातली, प्रत्येक तरुणाच्या मनातली ही गोष्ट आहे. जरी या सिनेमाची पार्श्वभूमी गावची असली तरीही सर्व संदर्भ शहरी, आजच्या काळातील आहे. नव्या सिस्टिममुळे गावची आणि शहरातील सामान्यांची काय अवस्था झाली आहे?, यावर टीडीएम भाष्य करतो." यादरम्यान 'टीडीएम'चे संपूर्ण शूटिंग अहमदनगर जिल्ह्यात झाले असल्याचा गौप्यस्फोट भाऊरावांनी केला. "टीडीएमचे संपूर्ण शूटिंग नगरमधील पारनेर तालुक्यातील कोकणी गावात झाले आहे. ४८ दिवसांत सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले. पृथ्वीराज, कालिंदी, अहमदनगरचे नाना मोरे यांच्याबरोबरच कलाकारांची मोठी टीम टीडीएमचा भाग आहे. जवळजवळ ३०-३८ कलाकारांचा सिनेमात समावेश आहे. तर सिनेमातील काही सिनमध्ये १००-१५० लोकांचा क्राउड आहे. तर काही सीन मोठे असून त्यात हजारचा क्राउड आहे", अशी माहिती दिग्दर्शक भाऊरांवांनी दिली.
नगरचे कौतुक करताना भाऊराव म्हणाले, "पुणे आणि मुंबईचा पर्याय म्हणून महाराष्ट्रातील नगर हे शहर शूटिंगसाठी सर्वोत्तम आहे. विशेष म्हणजे, या जिल्ह्यात पाठिंबा देणारी खूप माणसं आहेत. तसेच जिल्ह्यात अनेक गुणी कलाकार आहेत. नगरमध्ये खूप चांगल्या लोकेशन आहेत, सर्व सोई सुविधा आहेत. नगरमध्ये फिल्म इंडस्ट्रीचं एक वेगळं रोपटं तयार होतंय." तसेच "हा मेड इन नगर टीडीएम पाहायला विसरू नका, त्याला भरभरून प्रेम द्या," असे आव्हानही भाऊरावांनी नगरवासींयांना केले आहे.