Thu May 01 16:33:09 IST 2025
नवी दिल्ली : देशातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून १२ वी नंतरच्या डिग्रीसाठी म्हणजेच ग्रॅज्युएशनसाठी बीए, बीकॉम आणि बीएससीसाठी जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांना डिग्री मिळविण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. याबाबतचा महत्वाचा निर्णय विश्वविद्यालय अनुदान आयोगाने घेतला आहे. पुढील आठवड्यापासून याबाबतची माहिती सर्व विद्यापीठांना पाठविली जाणार आहे.
यामध्ये ४५ केंद्रीय विद्यापीठांचा देखील समावेश आहे. ही माहिती युजीसीच्या अध्यक्षांनी दिली. युजीसीने (Decision of UGC) यासाठी चार वर्षांचे ग्रॅज्युएशन प्रोग्रामचे फ्रेमवर्क निश्चित केले आहे. केंद्रीय विश्वविद्यालयासह राज्य स्तरावरील आणि खासगी विश्वविद्यालयेदेखील चार वर्षांचा अंडरग्रॅज्युएट कोर्स लागू करणार आहेत. देशीतील अनेक डीम्ड टू बी विद्यापीठेदेखील हा अभ्यासक्रम स्वीकारण्यास तयार झाली आहेत.
विद्यार्थ्यांकडे तीन वर्षांत डिग्री मिळविण्याचा पर्यायही खुला असणार आहे. हा पर्याय या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे त्यांच्यासाठी असणार आहे. तसेच हे विद्यार्थी पुढील शैक्षणिक वर्षात चार वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी देखील अपग्रेड करू शकतात. तसेच जे विद्यार्थी आता पहिल्या, दुसऱ्या वर्षाला आहेत, ते देखील FYUGP चा पर्याय निवडू शकतात. चार वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठे त्यांच्या स्तरावर काही नियमही बनवू शकणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन प्रोग्राम पूर्ण केला आहे, त्यांना पीजी किंवा एमफिलसाठी प्रवेश घ्यायचा असल्यास ५५ टक्के गुण असणे गरजेचे असणार आहे.